विनू मंकड यांच्या मुलाची बीसीसीआयला विनंती

क्रिकेटच्या खेळात मंकडींग हा शब्द नवा नाही. हा शब्द आता पुन्हा चर्चेत आला आहे. ही धावबाद पद्धत अनौपचारिकपणे मंकडींग म्हणून ओळखली जाते. १९४८ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा क्रिकेटमध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. या दौऱ्यात भारताचे अष्टपैलू खेळाडू विनू मंकड यांनी पहिल्यांदा बिल ब्राऊन यांना विवादित पद्धतीने बाद केले होते. तेव्हापासून क्रिकेटमध्ये अशा रनआऊटला मंकडींग म्हणतात. मात्र, दिवंगत क्रिकेटपटू विनू मंकड यांचे पुत्र राहुल मंकड यांनी या शब्दावर आता आक्षेप नोंदवला आहे.

दिवंगत क्रिकेटपटू विनू मंकड यांचा मुलगा राहुल यांनी हा शब्द वापरल्याबद्दल टीकेची झोड उठवली असून, या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी त्यांनी बीसीसीआयला मेल लिहिला आहे. राहुल यांनी बीसीसीआयला केलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, त्यांना क्रिकेटमध्ये मंकडींग शब्दाचा वापर अपमानास्पद वाटतो.

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर पेजवर १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात धावबाद झाल्याची नोंद मंकडींग या शब्दाने झाली आहे. असा उल्लेख राहुल यांना अजिबात आवडलेला नाही. याबद्दल दुःख व्यक्त करत राहुल मांकड यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना मेल लिहून याच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

वृत्तानुसार, राहुल यांनी लिहिलेल्या मेलमध्ये, बीसीसीआयच्या वेबसाइटवर केलेल्या पोस्टवरून निर्माण झालेल्या अपमानास्पद आणि नको असलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मी हा मेल लिहित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राहुल यांनी दुजोरा दिला आहे की, त्यांना बोर्डाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. इतकंच नाही तर बीसीसीआयने पोस्ट हटवली देखील नाही.

राहुल यांनी आपल्या मेलमध्ये लिहिले आहे की, आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये मंकडींग हा शब्द वापरणे बंद केले आहे आणि त्याला वादग्रस्त धावबाद म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्या शब्दाचा वापर सुरू ठेवला तर तो विनू मंकड यांचा पूर्णपणे अनादर होईल.

You might also like

Comments are closed.