पुणे। महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या वतीने रोईंग खेळामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ एप्रिल ते १५ जून या दरम्यान रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे सचिव संजय वळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मे महिन्यात होणा-या राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धा आणि त्यानंतर दाल लेक, काश्मिर येथे होणा-या राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेकरीता या शिबिरातून खेळाडू निवडण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेला रॉयल कॅनॉट बोट क्लबचे अध्यक्ष अरुण कुदळे, सचिव मच्छिंद्र देवकर, क्रीडा विभागाचे अध्यक्ष समीर सावळा, सदस्य रमेश शाह, महाव्यवस्थापक नवाझ खान तसेच महाराष्ट्र रोईंग असोसिएशनचे अध्यक्ष क्रिष्णानंद हेबळेकर, सचिव संजय वळवी, खजिनदार स्मिता यादव, मुज्तबा लोखंडवाला, राजेंद्र देशपांडे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या वतीने प्रथमच ज्या विद्यार्थ्यांना रोईंग शिकण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी अशाप्रकारचे शिबिर घेण्यात येत आहे. आतापर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांना रोईंग शिकण्यासाठी मर्यांदा होत्या. त्यामुळे रोईंग खेळाला शालेय स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी देखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आॅलिम्पिक २०२८ च्या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील चांगले खेळाडू तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. संजय वळवी आणि मुज्तबा लोखंडवाला हे रोईंग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. रोईंगच नाही तर सेलिंग, लॉन टेनिस, जलतरण, टेबल टेनिस इत्यादी इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा रॉयल कॅनॉट बोट क्लबचा मानस आहे.