ब्राह्मण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन;दोन ते नऊ एप्रिल दरम्यान रंगणार ३३ सामन्यांची स्पर्धा

औरंगाबाद (प्रतिनिधी): ब्राह्मण समाजातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि समाजातील युवक-ज्येष्ठांचे एकत्रीकरण करण्याच्या हेतूने ब्राह्मण प्रीमियर लीग – २०२२ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. शहरातील दोन क्रिकेट मैदानांवर दोन ते नऊ एप्रिल दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती आयोजन समितीतर्फे प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.
यंदाच्या ब्राह्मण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ सहभागी होणार आहेत. यातील प्रत्येक संघात पंधरा खेळाडूंचा समावेश राहणार आहे. दोन एप्रिल, अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी या स्पर्धेचा आरंभ गुढी उभारून सकाळी दहा वाजता केला जाणार आहे. शहरातील सातारा भागात असलेल्या एमआयटी महाविद्यालय आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील मैदानावर या क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघात दोन ज्येष्ठ खेळाडू घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये एकूण ३३ सामने होणार आहेत. यातील प्रत्येक सामना हा १० षटकांचा राहणार आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन स्पर्धा आयोजन समिती सदस्य अनंत नेरळकर, योगेश जोगळेकर, अनिरुद्ध मोहनपुरकर, अमोल अभ्यंकर , अभिषेक कादी व आयोजन समिती मधील सर्व सदस्यांनी केले आहे.
स्पर्धेतील सहभागी संघ:
युनिव्हर्सल इलेव्हन, ब्रम्हयुग फायटर्स, पेशवा स्ट्रायकर्स, संभाजीनगर रॉयल्स, मक्केश्वर इलेव्हन, पेनल्टी टायगर्स, ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ , सनआर्च युगंधर इलेव्हन, महालक्ष्मी इलेव्हन, प्रोफेशनल क्रिकेट अकादमी, चाणक्य वॉरियर्स, वज्र इलेव्हन
Comments are closed.