कोल्हापूर(प्रतिनिधी)-अष्टहजारी शिखरांची आव्हानेच वेगळी असतात. हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना, ताशी ६० किमीपेक्षाही अधिक वेगाने वाहणारे वारे, सतत होणारा हिमवर्षाव, हवेतील प्राणवायूचे प्रमाण केवळ 1 % ते 2 % अशा खडतर ठिकाणी यशस्वी चढाई करणे म्हणजे अदभुत कामगिरी. करवीर हायकर्सची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने माऊंट मनस्लू या शिखरावर मंगळवारी सकाळी भारताचा तिरंगा फडकवला.
जगात माऊंट एव्हरेस्टसह एकूण चौदा अष्टहजारी शिखरे असून माऊंट मनस्लू हे आठव्या क्रमांकाचे शिखर आहे. 26781फूट (8163 मीटर) इतक्या उंचीवरील माऊंट मनस्लूवर तिरंगा फडकवणारी ती कोल्हापुरातील सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली आहे.
गेल्या मे महिन्यात कस्तुरी एव्हरेस्ट मोहिमेवर होती. मात्र, खराब हवामानामुळे तिला ही मोहिम कॅम्प चारवरून थांबवावी लागली होती.
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी दोन वर्षे तिने कष्ट घेतले. तत्पूर्वी अनेक वर्षे पदभ्रंमती आणि गिर्यारोहनाच्या माध्यमातून तिची तयारी सुरू होती. गेल्या वर्षी कोरानामुळे तिची एव्हरेस्ट मोहिम थांबली. यंदाही अनेक अडचणींवर मात करत १४ मार्चला ती एव्हरेस्टला रवाना झाली होती. पण, चक्रीवादळामुळे एव्हरेस्टवर प्रचंड वारे आणि हिमवर्षावाला प्रारंभ झाला. सुरक्षितेतसाठी म्हणून कस्तुरीसह तिच्या टीमला कॅम्प चारवरून तीनवर व पुन्हा कॅम्प दोनवर खाली यावे लागले होते.
त्यानंतरही तिने पुन्हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाली असून चार सप्टेंबरला ती माऊंट मनस्लू शिखर सर करण्यासाठी रवाना झाली. दोन रोटेशननंतर २५ सप्टेंबरला तिने चढाईला प्रारंभ केला. रविवारी (२६ सप्टेंबरला कॅम्प दोनवर ती पोचली. त्यानंतर 27 सप्टेंबरला कॅम्प तीनवर पोचली आणि रात्री पुन्हा चढाईला सुरवात करून 28 सप्टेंबरला सकाळी सव्वासातच्या सुमारास मा. मनस्लू शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला.