लंडन – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.
२३ वर्षीय नीरजने गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता. त्याने भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत भारताला ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. या कामगिरीची आता लॉरेस पुरस्कारांकडून दखल घेण्यात आली आहे. ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत. विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.
टोक्यो ऑलिम्पिकमधील माझ्या कामगिरीची दखल घेण्यात आली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. केवळ तंदुरुस्त राहण्यासाठी खेळाकडे वळणारा भारताच्या ग्रामीण भागातील एक मुलगा, ते ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता हा प्रवास खूपच अद्भूत राहिला आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जागतिक स्तरावर भारताला पदके मिळवून देणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता तारांकित खेळाडूंसह लॉरेस पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हे खूपच खास आहे. अशी प्रतिक्रिया नीरजने व्यक्त केली.