मुंबई- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्र संघातील वेगवेगळे पदक विजेते खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा लवकरच राज्य शासनातर्फे सत्कार केला जाईल असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी येथे क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी श्री महाजन यांनी हा समारंभ दिवाळी झाल्यानंतर आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी अतिशय शानदार सोहळ्यात खेळाडूंचा सन्मान आयोजित केला जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही तारीख निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
श्री पवार यांनी राज्यातील खेळाडूंच्या विविध मागण्यांबाबत मंत्र्यांबरोबर चर्चा केली. क्रीडा कार्यकर्त्यांना शिवछत्रपती पुरस्कार सुरू करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना शासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी देणे, खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण, ऑलिंपिक भवनाची उभारणी करणे इत्यादी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संदर्भातही प्राथमिक चर्चा करण्यात आली.