अहमदाबाद- छत्रपती संभाजीनगरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर तेजस शिर्से मंगळवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. या सह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. त्याने पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तामिळनाडूच्या सुरेंद्र आणि सर्विसेस च्या तरुणदीपला पिछाडीवर टाकून तेजसने 13.84 सेकंदात निश्चित अंतर गाठले. या सह तो या गटामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. या गटात तामिळनाडूच्या सुरेंदरला रौप्य आणि सर्विसेसच्या तरुणदीपला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
दोन वेळच्या राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिरसेने 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये आपले वर्चस्व अबाधित ठेवले. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवता आला. सर्वोत्तम सुरुवात करत त्याने शेवटच्या सेकंदापर्यंत आपली लय कायम ठेवली. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गाठता आले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाची लूट करून दिली.
भविष्यातील सुपरस्टार धावपटू : व्यवस्थापक कांबळे
छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिरसे हा गुणवंत धावपटू आहे. तो स्पर्धेगणिक सर्वोत्तम कामगिरी करत आपली क्षमता सातत्याने सिद्ध करत आहे. त्यामुळे भविष्यातील सर्वोत्तम धावपटू म्हणून तो आपली ओळख निर्माण करणार आहे. आता राष्ट्रीय स्पर्धेतील त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला, अशा शब्दात महाराष्ट्र अथलेटिक संघाचे व्यवस्थापक डॉ. दयानंद कांबळे यांनी तेजस वर कौतुकाचा वर्षाव केला.
प्रचंड मेहनती धावपटू: कोच मोदी
छत्रपती संभाजीनगर येथील तेजस हा प्रचंड मेहनती असा धावपटू आहे. त्यामुळे त्याला ज्युनिअर गटात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करता आली. त्याने आपल्या इव्हेंट मधील वर्चस्व आबादी ठेवत आताही राष्ट्रीय स्पर्धेत विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या धावपटूचे संघाच्या सोनेरी यशात हे मोलाचे योगदान निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात कोच सुरेंद्र मोदी यांनी तेजसचा गौरव केला.