जबलपूर(बाळ तोरस्कर):-५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत आज दुसर्या दिवशी पुरुषांमध्ये महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर, कर्नाटकाने त्रिपुरावर व कोल्हापूराने उत्तराखंडवर मोठे विजय मिळवले. महिलांमध्ये केरळने गोव्यावर, कोल्हापूरने बिहारवर तर कर्नाटकाने उत्तराखंड वर सहज विजयश्री प्राप्त केली.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ‘ब’ गटातील हिमाचल प्रदेशवर २४-०८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर (३:०० मि. संरक्षण व २ गडी), अनिकेत पोटे (२:४० मि. संरक्षण व ३ गडी), कर्णधार सुयश गरगटे (२:०० मि. संरक्षण व ३ गडी), गजानन शेगाळ (२:०० मि. संरक्षण) व मिलिंद कुरपे (४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत मोठ्या विजयात बहुमोल वाटा उचलला. पराभूत हिमाचलच्या रोहित वर्मा व राहुलने थोडाफार प्रतिकार केला.
पुरुषांच्या ‘क’ गटातील कोल्हापूराने उत्तराखंडवर ३१-१० असा एक डाव २१ गुणांनी मोठा विजय प्राप्त केला. या सामान्यत कोल्हापूरच्या रोहण शिगटे (२:१० मि. संरक्षण व ८ गडी), अवधूत पाटील (२:३० मि. संरक्षण व ३ गडी) व अविनाश देसाई (१:५० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी चौफेर खेळाचे प्रदर्शन केले सहज विजय मिळवला तर पराभूत उत्तराखंडच्या कोणत्याच खेळाडूला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
महिलांमध्ये ‘फ’ गटातील कर्नाटकने उत्तराखंडवर १५-०१ असा डावाने एकतर्फी विजय साजरा केला. कर्नाटकच्या के. आर. तेजस्विनीने पहिल्या डावात नाबाद ९:०० मि. संरक्षण केल्याने कर्नाटकला मोठा विजय साजरा करता आला. त्यांच्याच बी. चित्राने दुसर्या डावात नाबाद ६:४० मि. संरक्षण व ३ बळी मिळवताना तेजस्विनीला उत्कृष्ट साथ दिली तर एल. मोनिका (५ बळी} के. आर. दिव्या (४ बळी) यांनीही विजयात महत्वाची कामगिरीची नोंद केली. उत्तराखंडच्या अंजु आर्या व भारती गिरी यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.
महिलांच्या ‘ग’ गटात केरळने गोव्यावर १२-०३ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. केरळच्या अपर्णाने (४:३० मि. संरक्षण) करत विजयात मोलाचा वाटा ऊचलला. तर पराभूत गोव्याच्या कविता देविदास ( १:५०, १:१० मि. संरक्षण) व कर्णधार प्रमिता वेळीप (१:३० मि. संरक्षण व २ बळी) यांनी दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.
इतर निकाल:
पुरुष विभागात कर्नाटकने त्रिपुरावर १९-०६ तर महिला विभागात कोल्हापूराने बिहारवर ३४-११ असा विजय साजरा केला.