अहमदाबाद- महाराष्ट्र संघाच्या गुणवंत युवा खेळाडू इशिता रेवाळेने 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत कांसेपतकाचा बहुमान पटकावला. तिने महिला गटाच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक मध्ये तिसरे स्थान गाठले. मुंबईच्या इशिताने 41.80 गुणाचं कांस्यपदक आपल्या नावे केले. या दरम्यान तिने रौप्य पदकासाठी ऑलिंपियन प्रणिती नायक सोबत शर्थीची झुंज दिली.
अवघ्या ०.२५ गुणांच्या पिछाडीने इशिताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र या दरम्यानची तिची झुंज लक्षवेधी ठरली. या उल्लेखनीय कामगिरीतून तिने महाराष्ट्र संघाला वैयक्तिक गटात पदकाचे खाते उघडून दिले.मुंबई येथील गुणवंत खेळाडू इशिताने पहिल्यांदाच सीनियर गटामध्ये सहभाग नोंदवला. तिने आपल्या पदार्पणातील नॅशनल गेम्समध्ये पदक जिंकण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे आता महाराष्ट्र संघाच्या नावे जिम्नॅस्टिक मध्ये दुसऱ्या पदकाची नोंद झाली.
ऑलम्पिकसाठी पात्र ठरणार : कोच ढगे
महाराष्ट्राची स्टार खेळाडू म्हणून इशिता आता समोर येत आहे. तिची आर्टिस्टिक जिम्मेस्टिक प्रकारातील कामगिरी सर्वोत्तम ठरत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राची ही खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित करेल. दर्जेदार कामगिरी करण्याची प्रचंड क्षमता तिच्यात आहे. तिने सांगितलं वैयक्तिक गटात महाराष्ट्राला पदकाचा बहुमान मिळवून दिला, अशा शब्दात प्रशिक्षक प्रवीण ढगे यांनी इशितावर कौतुकाचा वर्षाव केला.