महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि खऱ्या अर्थाने ‘जलपरी’ चा मान मिळविला. तिने स्प्रिंग बोर्ड वरून सूर मारताना अचूकता व लवचिकता याचा सुरेख समन्वय दाखवीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिने यापूर्वी शालेय आणि खुल्या गटातील अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळविली आहेत. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तिला मिळाला आहे.
ईशा वाघमोडे हिला ब्रॉंझपदक
याच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिने ब्रॉंझपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली. सोलापूरच्या या खेळाडूने आतापर्यंत शालेय राष्ट्रीय, सब ज्युनिअर व जुनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. सन २०१६ मध्ये तिने श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती.
डायव्हिंगला वाहून घेणारे कुटुंब
पुरुषांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या आदित्य गिरामयाला ब्रॉंझपदक मिळाले. आदित्य याने यापूर्वी जागतिक स्तरावरील स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आदित्य, निहाल व बिल्वा या भावंडांनी आजपर्यंत महाराष्ट्राला शालेय, सब ज्युनियर, ज्युनियर व वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला डायव्हिंग मध्ये अनेक पदके मिळवून दिली आहेत. या भावंडांना त्यांच्या पालकांनी अतिशय संघर्ष करीत डायव्हिंगसाठी प्रोत्साहन दिले आहे.