ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’

विराट कोहली याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेचसे ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. सोमवार रोजीही (०६ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड  यांच्यात झालेल्या मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय प्राप्त केला. यानंतर विराटवर कौतुकांचा वर्षाव करताना माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण याने त्याला भारतातील सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार संबोधले आहे.

इरफानच्या मते, कसोटी संघाच्या नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, एमएस धोनी यांनाही मागे सोडले आहे.

इरफानने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘विराटच्या नेतृत्त्वाखालील संघाने, सोमवारी वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडला ३७२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केल्यानंतर कसोटी मालिकेतही बाजी मारली आहे. जसे की, मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आताही सांगतोय, विराट भारतातील आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार आहे. तो ५९.०९ च्या विजयी सरासरीसह अव्वलस्थानावर आहे.’

विराट कोहली आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी विजयासह विराटच्या शिरपेचात अजून एका विक्रमाची नोंद झाली. तो भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. याबाबतीत तो माजी कर्णधार एमएस धोनी याच्यापेक्षा खूप पुढे आहे.

मुंबई कसोटी हा विराटचा कर्णधार म्हणून ६६ वा सामना होता. या ६६ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना त्याने ३९ सामने जिंकले आहेत तर १६ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच उर्वरित ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. यासह त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताची विजयी सरासरी ५९.०९ इतकी झाली आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ६० पैकी फक्त २७ कसोटी सामने जिंकले होते.

अशाप्रकारे विराटने भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे आणि त्याची विजयी सरासरीसुद्धा ५० टक्केपेक्षा जास्त राहिली आहे. तो भारताचा असा पहिला कर्णधार आहे, ज्याने १० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले अन् त्याची विजयी सरासरी ५० टक्केंपेक्षा जास्त आहे.

You might also like

Comments are closed.