पुणे | महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धेत मुलींच्या ५२ किलो खालील गटात ठाण्याच्या शायना देशपांडेने गोंदियाच्या दिक्षा खरेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आमदार मुक्ता टिळक या स्पर्धेच्या संयोजिका आहेत.
टिळक रोड येथिल महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या ५२ किलो खालील गटात अंतिम लढतीत शायना देशपांडेने केसागातामे कौशल्यावर दिक्षा खरेविरूध्द पूर्ण गुण (इप्पोन) मिळवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. दिक्षा खरेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कांस्यपदकाच्या पहिल्या लढतीत पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या (पीडीजेए) सानिका शेडगेने धुळ्याच्या गुंजन पाटीलचा पराभव केला. दुसºया कास्यपदकाच्या लढतीत नागपूरच्या केतकी गोरेने वर्धाच्या दिक्षा माडवीला नमवित कास्यपदक आपल्या नावावर केले.
तत्पूर्वी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. राजकुमार पुनकर व स्पर्धेचे निरिक्षक अनिल सपकाळ यांंच्या हस्ते श्री हनुमान देवता यासह ज्यूदो खेळाचे संंस्थापक डॉ जिगोरो कानो, भारतीय ज्यूदोचे संस्थापक कै. रघुनाथ खानिवालेसर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक, तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे, असोसिएशनचे वरिष्ठ पद्धिकारी, भाजपा कसबा मतदार संंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकड, छगन बुलाखे, सरचिटणीस अॅड. राणीताई कांबळे, कसबा महिला आघाडीच्या अध्यक्षा आश्विनी पांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित कंक उपस्थित होते.