महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकले मात्र महिला गटात महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राने सेनादल संघाचा २-० असा सहज पराभव केला. या स्पर्धेत पदार्पण करणारा महाराष्ट्राचा
चौदा वर्षीय खेळाडू मानस धामणे याने सेनादलाच्या फैजल कमर याला चुरशीच्या लढतीनंतर ३-६,६-३,७-५ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पाठोपाठ महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे याने सेनादलाचा ईशात इक्बाल याच्यावर ६-३, ६-२ अशी सहज मात करीत महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.महिलांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राला यजमान गुजरात संघाकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला.
एकेरीच्या पहिल्या लढतीत महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने गुजरातच्या झील देसाई हिचा ६-४, ६-२ असा पराभव केला आणि महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र एकेरीच्या दुसऱ्या लढतीत ऋतुजा भोसले हिला भारताची अव्वल दर्जाची खेळाडू अंकिता रैना हिने ६-१,६-४ असे पराभूत करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. दुहेरीच्या निर्णायक लढतीत देसाई व रैना यांनी महाराष्ट्राच्या वैष्णवी व ऋतुजा यांना ६-४,६-० असे हरविले आणि संघास सुवर्णपदक मिळवून दिले.