औरंगाबाद-येथील सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे औरंगाबाद ते शिर्डी असा १४० किलोमीटर अशी सामाजिक संदेश देणारी सायकल वारी आयोजित करण्यात आली. या वारीला महापौर नंदकुमार घोडले यांनी ग्रीन सायकल पार्क येथे शनिवारी ( ता. ९) हिरवा कंदील दाखवून रवाना केली.
यावेळी बोलताना श्री. घोडले म्हणाले की, आरोग्य जपणे हे आपले आद्यकर्तव्य असून सायकल, चालणे, धावणे अथवा योगासने प्रत्येकाने दिवसभरात किमान ६० मिनिटे व्यायाम सक्तीने करायलाच हवा. सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून सायकल वारीच्या निमित्ताने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे असंख्य नवनवीन तरुणांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. श्री शिर्डी साईबाबा आपणा सर्वांना चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना.
यावेळी सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे म्हणाले की, फाउंडेशन अनेक वर्षांपासून कार्यरत असून नवनवीन सदस्य जोडले जात आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रामुख्याने विद्यार्थी दशेतच सायकलची सवय लावून घेतल्यास ही सवय पुढे आयुष्यभर कायम राहू शकते. या प्रकारच्या वारीमधून अनेकांना प्रेरणा मिळते. आज वारीदरम्यान गंगापूर, महालगाव, वैजापूर, संवत्सर आणि शिर्डी येथील लोकांसोबत संवाद साधून “सायकल चालवा,पर्यावरण वाचवा” आणि “सायकल चालवा, तंदुरुस्त राहा” हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे निश्चितच काही नवीन लोक या उपक्रमाशी जोडले गेल्यास ही वारी खऱ्या अर्थाने फळाला लागली असे म्हणता येईल. या वारीमध्ये माझ्यासह डॉ. प्रशांत महाले, अभिजीत हिरप, बी. आर. मुरमाडे यांचा समावेश आहे.
यावेळी जात पडताळणी समिती सहआयुक्त विजयकुमार कटके, ऍड. मनोज बोईनवाड, सोनाजी कासेवाड, धनंजय निठवे, लक्ष्मण तरटे यांची उपस्थिती होती.