औरंगाबाद (प्रतिनिधी): बेगमपुरा येथील स्व. प्रभाकर पांडे बास्केटबॉल मैदानावर सुरू असलेल्या मास्टर्स ट्रॉफी २०२२ स्पर्धेत मास्टर्स ग्रुप संघाने एसएफएस संघावर अवघ्या ३ गुणांनी रोमहर्षक विजय मिळवला. साखळी सामन्यात मास्टर्सने ६५-६२ बास्केट गुणांनी बाजी मारली.
सामन्यात विजयी संघाकडून आकाश खरात, आसिफ शेख, विजय पिंपळे, आकाश खोलवाल आणि प्रशांत बुरांडे यांनी आपल्या उंचीचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत अचूक बास्केटच्या जोरावर चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन केले. संघातील ताळमेळ व वेगवान खेळ त्यांच्या विजयाचे वैशिष्ठ ठरले. एसएफएसच्या अक्षय देवकर, धवल मोरे, विशाल बकाल, अनिकेत पवार यांचे प्रयत्न अपुरे पडले.
दुसऱ्या साखळी सामन्यात चॅम्पियन संघाने आरबीबीसी संघावर ५७-२९ असा एकतर्फी विजय मिळविला. भारतीय सेना खेळाडू गणेश गायके, अनिरुद्ध पांडे, अल्केष डोंगरे, अंकुश सोनी आणि संदीप ढंगारे यांनी अफलातून खेळ करत सामन्यात सुरवाती पासूनच पकड जमवत विजय मिळविला. पराभूत संघातर्फे विजय गाडे, अफरोज खान, सागर कापडणे, प्रदीप भालेराव आणि संदीप सातदिवे यांनी आपले कसब पणाला लावली होती.