औरंगाबाद(प्रतिनिधी): देशात स्वत:चा ज्युदो हॉल तयार करणारी औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटना एकमेव आहे. पदाधिकाऱ्यांच्या अविरत मेहनतीचे व इमानदारीचे हे फळ आहे. आमच्या भागात ज्युदो सुरू झाल्याने हॉलचा परिसर विकसित करण्यासाठी संपूर्ण मदत करु. आम्ही खेळाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केले.
जिल्हाधिकार सुनील चव्हाण यांच्या सौजन्याने नाविन्यपूर्ण क्रीडा योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा ज्यूदो संघटनेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०९ ज्युदो मॅट प्राप्त झाल्या आहेत. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत हाेते. त्याचबरोबर, वाळूज येथे एका देणगीदाराकडून तयार करण्यात आलेल्या ४० मॅट संघटनेला उपलब्ध झाल्या आहेत. ‘आमदार अतुल सावे यांनी ज्युदोसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची सुचना आपल्याला केल्याचे सांगितले, राठोड यांनी सांगितले.’
प्लॉट क्र २०६ -ए, किटली गार्डन जवळ, एन-३, सिडको येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. उद्योजक कवींद्र पाटील यांनी ४० मॅट्स संघटनेला देणगी स्वरूपात दिल्या.
भरत चौधरी यांनी ज्युदो हॉल बांधण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख दत्ता आफळे, जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा पोलिस निरिक्षक संतोष माने, माजी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत, डॉ. अजय दंडे, राज्य संघटनेचे सहसचिव डॉ. गणेश शेटकर, शोभना जोशी, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष मेजर भास्कर जाधव, भिमाशंकर नावंदे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, प्रसन्ना पटवर्धन, विश्वास जोशी, झिया अन्सारी, भिमराज रहाणे, अशोक जंगमे आदींसह परिसरातील नागरिक, खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार अतुल बमणोदकर यांनी मानले.
खेळणारी मुले हुशारच असतात :
पालक मुलांना खेळात पाठत नाही. मात्र, खेळ खेळणारी मुले इतरांपेक्षा शिस्तप्रिय व हुशार असतात. खेळणारी ९५ टक्के मुले नोकरी, उद्योग-धंदा करतात. बेरोजगार व वाया गेलेली नसतात. महाराष्ट्राच्या खेळाडूंना तोड नाही. कौशल्य व मेहनतीत ते कधी कमी पडत नाही. त्यामुळे खेळाडू मैदान असो वा आपल्या कामाच्या ठिकाण तो यशस्वी होतो, असे आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष माने यांनी म्हटले.
आमचे स्वप्न पुर्ण झाले :
गेली अनेक तप आम्ही ज्युदो हॉल उभारणीसाठी पाहत असलेले स्वप्न पूर्ण झाले. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. जागा दोन वेळा हातातून परत गेलेली असताना न्यायालयातून पुन्हा मिळवली. हॉली उभारणीसाठी सर्व खेळाडू, पालक, पदाधिकाऱ्यांनी खिश्यातून पैसा खर्च केला. औरंगाबादच्या ज्युदो विकासासाठी मी कायम लक्ष्य ठेवून असेल, असे महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख दत्ता आफळे यांनी म्हटले.
हॉल परिसराच्या विकासावर लक्ष्य :
हॉल बांधण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्याचे हे फळ त्यांना मिळाले. आता हॉलच्या दुसऱ्या मजल्याचे आमचे नियोजन आहे. आता हॉलच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास देखील करायचा आहे. नागरिकांनी आपल्या मुलांना किमान एक तास तरी मैदानावर घेवून यावे. त्यामुळे घरात बसून राहिलेल्या आणि मैदानावर आलेल्या आपल्या मुलांमध्ये झालेला सकारात्मक बदल आपल्याला जाणवेल, असे जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे यांनी म्हटले.