औरंगाबाद (प्रतिनिधी):गरवारे क्रिकेट संकुलावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व ३० व्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या बाद सामन्यात अनिल अहेवाडच्या (५३ धावा, २ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांधकाम विभाग ‘ब’ संघाने एमआयटी हॉस्पिटल संघावर अवघ्या १ धावेने थरारक विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात जिल्हा वकील ‘अ’ संघाने कास्मो फिल्म संघावर २ गडी राखून मात केली आणि तिसऱ्या सामन्यात मसिआ ‘ब’ संघाने लॅब टेक्निशियन संघावर ८ गडी राखून विजय संपादन केला. तिन्ही विजेत्या संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामन्यात अनिल अहेवाड, संतोष भारती व पंकज फलके सामनावीर ठरले.
एमआयटी हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांधकाम विभाग ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत सर्वबाद १४१ धावा केल्या. अनिल अहेवाडने ३१ चेंडूत १ षटकार व ७ चौकारांसह ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. शैलेश सूर्यवंशीने २५ चेंडूत १ चौकारासह १६ धावा तर अंकुश जाधव व शेख सिद्दिकीने प्रत्येकी १५-१५ धावांचे योगदान दिले. एमआयटीतर्फे सारंग कांबळेने ९ धावांत ३ गडी, रत्नाकर देवांगने ३१ धावांत ३ गडी बाद केला. प्रत्युत्तरात, एमआयटी संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १४० धावाच करू शकला. युवा फलंदाज क्षितिज चव्हाणने ४७ चेंडूत ४ चौकारांसह ४१ धावा काढल्या. रत्नाकर देवांगने २५ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ३२ धावा, कर्णधार साई दहाळेने ९ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. बांधकाम संघातर्फे अनिल अहेवाडने २६ धावांत २ गडी तर कवरसिंह चव्हाण, अर्शद खान, सय्यद असद अली व शैलेश सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रितेशचे अर्धशतक व्यर्थ, वकील संघ जिंकला :
दुसऱ्या सामन्यात कास्मो फिल्म संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. प्रितेश चार्ल्सने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने २९ चेंडूंत २ उत्तुंग षटकार व १० चौकारांसह ५७ धावा केल्या. संदीप भंडारीने ४७ चेंडूत ७ चौकारांसह ४५ धावा, राजेश पवारने १५ चेंडूंत २ चौकारांसह २३ धावा तर कर्णधार रोहन हंडिबागने २० चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. वकीलांतर्फे संतोष भारतीने २१ धावांत ३ गडी तर आदर्श जैनने ३१ धावात १ गडी बाद केला. तीन फलंदाज धावचीत झाले. प्रत्युत्तरात, वकील संघाने १९ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. अष्टपैलू संतोष भारतीने ३५ चेंडूंत १ षटकार व ४ चौकारांसह सर्वाधिक ३८ धावा केल्या. सचिन सुदामेने १४ चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ३१ धावा, आदर्श जैनने २३ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावा आणि अनंता बदाडेने १७ चेंडूंत २ चौकारासह २० धावांचे योगदान दिले. कास्मोच्या कर्णधार रोहन हंडिबाग, प्रितेश चार्ल्स, जय हर्दे, विराज चितळेने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
निटूरकरची हॅटट्रिक, अनुभवी फलकेचे अर्धशतक :
तिसऱ्या सामन्यात लॅब टेक्निशियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १८६ धावा काढल्या. सलामीवीर इरफान पठाणने ५८ धावा काढल्या. विष्णू पाटीलने २६ चेंडूंत ४ षटकार व १ चौकारांसह ४७ धावा, उमेश पवारने २५ चेंडूंत ७ चौकारांसह ३३ धावा तर सुनील राठोडने २२ चेंडूंत २ षटकार व २ चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. मसिआच्या मंगेश निटूरकरने हॅट्रिक घेत २९ धावांत ४ गडी बाद केले. राम राठोडने २८ धावांत २ गडी आणि पंकज फलके व संदीप गायकवाड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. प्रत्युत्तरात, मसिआने १६ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. अनुभवी फलंदाज पंकज फलकेने अप्रतिम फलंदाजी करताना केवळ ३२ चेंडूंत ३ उत्तुंग षटकार व ८ चौकार खेचत नाबाद ७० धावांची विजयी खेळी केली. त्याला साथ देत संदीप गायकवाडने २७ चेंडूंत १ षटकार व ७ चौकारांसह ४८ धावा केल्या. निकीत चौधरी २१ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावा तर निखिल कदमने १७ चेंडूंत १ षटकार व २ चौकारांसह नाबाद २४ धावांचे योगदान दिले. टेक्निशियन संघातर्फे उमेश पवारने एकमेव गडी बाद केला आणि एक फलंदाज धावचीत झाला.