तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला एक रौप्य व एक कांस्य पदक

गांधीनगर- 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात ईप्पी प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने रौप्यपदक तर महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने फॉइल प्रकारात कांस्य पदक पटकावले.

तलवारबाजी स्पर्धेत इप्पी प्रकारात महाराष्ट्र पुरुष संघाने ओडिशा संघावर अटीतटीचा सामन्यात 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने पंजाब संघाला 45-43 असे अटीतटीचा सामन्यात हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत एसएसीबी संघाने महाराष्ट्र संघाची घोडदौड 44-30 अशी रोखून सुवर्णपदक जिंकले. अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र संघ पराभूत झाल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
रौप्यपदक विजेत्या संघात अजिंक्य दुधारे, प्रथमकुमार शिंदे, गिरीश जकाते व निखिल कोहाड या खेळाडूंचा समावेश आहे.

फॉइल प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने चंदीगड संघाला अटीतटीचा सामन्यात 44-39 असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघास केरळ संघाविरुद्ध 27-45 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र संघास कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदक विजेत्या संघात ज्योती सुतार, वैभवी इंगळे, वैदेही लोहिया, खुशी दुखंडे या खेळाडूंचा समावेश आहे.

तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एक रौप्य व एक कांस्य अशी दोन पदके जिंकल्याने संघ व्यवस्थापन खुशीत होते. संघाचे प्रशिक्षक स्वप्नील तांगडे, संजय भुमकर, शोएब मोहंमद वकील, भुषण जाधव, संघ व्यवस्थापक राजकुमार सोमवंशी, नयना नायर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

You might also like

Comments are closed.