गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आयआयटी गांधीनगर येथे सुरू असलेल्या स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. दोन्ही संघांची घोडदौड पाहता स्क्वॉश प्रकारात महाराष्ट्राला पदकाची निश्चित खात्री आहे.
पुरुष गटात स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चंदीगढ संघाचा 2-1 असा पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली. महाराष्ट्राच्या राहुल बैठा याने पृथ्वी यादव याचा 11-6, 11-5, 11-4 असा सहज पराभव करुन संघाला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर ओम सेमवाल याने सोनू प्रसादवर 11-7, 11-6, 11-8 असा विजय नोंदवत संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. महाराष्ट्र संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे सुरज चंद याने बाय दिला. त्यामुळे चंदीगढच्या नावावर एक विजय लागला.
महिला गटात महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघाचा 3-0 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राची अव्वल खेळाडू उर्वशी जोशी हिने अपूर्वा अडली हिचा 11-4, 11-4, 11-0 असा सहज पराभव करुन संघाचा पहिला विजय नोंदवला. अंजली सेमवाल हिने आर्या द्विवेदी हिला 11-5, 11-1, 11-7 अशा फरकाने नमवत संघाला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. जेनेट विधी हिने अखेरच्या सामन्यात विजय साकारत संघाला शानदार 3-0 असा विजय मिळवून दिला.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठल्यामुळे महाराष्ट्राच्या पदकाची संधी आहे. सुवर्ण पदक जिंकण्याची खात्री संघाचे प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव, प्रियांका मंत्री आणि संघाचे व्यवस्थापक आणि महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे यांनी व्यक्त केली आहे.