खो – खो मध्ये महाराष्ट्राच्या महिला, पुरुष संघांची सुवर्णपदकाकडे वाटचाल

अहमदाबाद- महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारुन सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे एक पदक तर निश्चित झाले आहे. परंतु, दोन्ही संघांनी स्पर्धेत निविर्वाद वर्चस्व गाजवले असल्याने दोन सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशा टीम व्यवस्थापनाला वाटत आहेत. दोन्ही गटातील अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र महिला खोखो संघाने दिल्ली संघाचा एक डाव आणि 8 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरी गाठली.महाराष्ट्र महिला संघाने प्रथम आक्रमण केले. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिल्लीविरुद्ध 22 गुणांची कमाई करीत सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. तब्बल 22 गुणांची आघाडी घेतल्याचा फायदा महाराष्ट्र संघाला झाला. दिल्ली संघ दबावात आला. त्यांना पहिल्या आक्रमणात अवघे सहा गुण मिळवण्यात यश मिळाले. महाराष्ट्र संघाने 16 गुणांची आघाडी घेतल्यामुळे दिल्ली संघावर फॉलोऑन लादण्यात आला.

फॉलोऑन मिळाल्यानेतर दिल्ली संघाचा खेळ अधिकच ढेपाळला. दिल्लीला केवळ 8 गुण मिळवता आले. महाराष्ट्र संघाने एक डाव आणि 8 गुणांनी बाजी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.महाराष्ट्र महिला संघाकडून प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड व अपेक्षा सुतार या खेळाडूंनी अफलातून खेळ केला. प्रियांका भोपी हिने 3.20 मिनीटे पळचीचा खेळ करुन दिल्लीच्या आक्रमणातील धार बोथट केली. प्रियांका इंगळे हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. तिने 3.50 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला आणि आठ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने 2 मिनीटे पळतीचा खेळ केला व 6 गुण मिळवले. अपेक्षा सुतार हिने 2 मिनीटे पळतीचा खेळ करुन 2 गुणांची कमाई केली. दिल्लीकडून परवीन निशा, मधू या खेळाडूंनी झुंज दिली.

दुस-या उपांत्य लढतीत ओडिशा संघाने कर्नाटक संघाचा 12 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना ओडिशा संघाशी होणार आहे. साखळी फेरीत महाराष्ट्र संघाने ओडिशा संघाला नमवले आहे. साहजिकच महाराष्ट्र महिला संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.

पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघावर एक डाव आणि 4 गुणांनी (26-10) विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्र संघाने वर्चस्व गाजवले. अविनाश देसाई, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, अक्षय भामरे, निहार दुबळे, दिलराज सेनगर, रामजी कश्यप या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावत सामना गाजवला.

अविनाश देसाई याने 8 गुणांची कमाई करुन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. प्रतिक वाईकर याने अष्टपैलू कामगिरी नोंदवताना 2 मिनीटे पळतीचा खेळ केला व 2 गुणांची कमाई केली. लक्ष्मण गावस याने 1 मिनीटे संरक्षण केले व 2 गुण संपादन केले. अक्षय भामरे याने 1.30 मिनीटे पळतीचा खेळ केला. निहार दुबळे याने 1.20 मिनीटे संरक्षण केले व 4 गुण मिळवत संघाची स्थिती भक्कम केली. दिलराज सेनगर याने 2.10 मिनीटे पळतीचा खेळ केला आणि 2 गुण मिळवले. राजमी कश्यप याने 2 मिनीटे व 1.40 मिनीटे संरक्षण करुन सर्वांचीच मने जिंकली. कर्नाटककडून महेश, सुदर्शन व शशीकुमार यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्र संघाने सामन्यावरील पकड कायम ठेवत अंतिम फेरी गाठली.

पुरुष संघांची सुवर्णपदकाकडे वाटचाल
                                                                                                          खो खो पुरुष संघ

महिला व पुरुष गटात महाराष्ट्राचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. दोन्ही संघांकडून सुवर्णपदकाची खात्री आहे, असा विश्वास भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस आणि संघाचे व्यवस्थापक गोविंद शर्मा, संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, कमलाकर कोळी, प्रवीण बागल यांनी व्यक्त करुन अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

You might also like

Comments are closed.