राजकोट- एक गोलने पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने बलाढ्य हरियाणा संघावर ३-१ असा शानदार विजय नोंदविला. सलग दुसरा विजय नोंदवित महाराष्ट्राने पुरुषांच्या हॉकीत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. भरत कुमार याने दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर द्वारा गोल करीत हरियाणा संघाला आघाडीवर नेले.
त्यानंतर बराच वेळ त्यांच्याकडे ही आघाडी होती. मध्यंतरापर्यंत त्यांनीच वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाल्मिकी याने ४६ व्या मिनिटाला सुरेख गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आक्रमणास धार आली.
त्यानंतर पाच मिनिटात महाराष्ट्राने दोन करीत सामन्यावर पकड मिळविली. पन्नासाव्या मिनिटाला सय्यद रहीम याने फिल्ड गोल करीत महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल झाल्यानंतर पाठोपाठ पुढच्याच मिनिटाला वेंकटेश केचे याने महाराष्ट्राचा तिसरा गोल नोंदविला. महाराष्ट्राने साखळी गटातील पहिल्या सामन्यात गुजरातवर २०-१ असा दणदणीत विजय नोंदविला होता.