पुणे : भारताचा अनुभवी खेळाडू युकी भांबरीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची संघर्षपूर्ण विजयाने सुरुवात केली. प्रज्ञेश गुणेश्वरनचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
सोमवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात युकीने स्लोव्हाकियाच्या जोसेफ कोव्हालिकला ६-७ (१०-१२), ६-२, ७-५ असे पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. त्यामुळे या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली आणि विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात आला. यात कोव्हालिकने १२-१० अशी सरशी साधत पहिला सेट आपल्या नावे केला.
यानंतर मात्र युकीने दमदार खेळ करताना दुसऱ्या सेटमध्ये ६-२ अशी बाजी मारली. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. यात ५-५ अशी बरोबरी असताना युकीने सलग दोन गेम जिंकताना हा सेट ७-५ असा जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अन्य लढतीत, प्रज्ञेशला पाचव्या मानांकित जर्मनीच्या डॅनियल अल्तामिरकडून ६-७ (५-७), २-६ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात अल्तामिरने चार वेळा प्रज्ञेशची सव्र्हिस मोडली. तसेच फ्रान्सच्या बिगरमानांकित क्वेन्टीन हेल्सने सातव्या मानांकित रिकार्डस बेरांकिसला ६-१, ६-२ असा पराभवाचा धक्का दिला.