मुंबई(प्रतिनिधी):महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने आयोजित खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये सरस्वती संघ आणि पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने अमरहिंद चषक पटकावला. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पुरुषांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने आणि महिलांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने विजय मिळवला. अमरहिंद मंडळाने पुरुष महिला निमंत्रित जोडजिल्हा खो-खो स्पर्धा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त या स्पर्धेचे दादर (प.) मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
विजेत्या संघांना महाराष्ट्र खो-खाे संघटनेचे खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी अमरहिंद मंडळाचे भास्कर सावंत, अरुण देशपांडे, दीपक पडते, प्रफुल्ल पाटील, जतिन टाकळे, कमलाकर कोळी, विजय राणे, विलास कारेकर यांच्यासह खो-खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबने मुंबईच्याच शिवनेरी सेवा मंडळावर अतिशय अटीतटीच्या लढतीत ९-९ (४-५, ४-३, १-१) असा लघुत्तम आक्रमणात १० सेकंदांनी विजय मिळवत अमरहिंद चषकावर नाव कोरले. संपूर्ण खेळात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरीची नोंद केल्याने प्रेक्षकांना अतिशय चांगल्या दर्जाचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात सरस्वतीच्या नम्रता यादव (२:००, २:२० मि. संरक्षण व ३ गुण), खुशबू सुतार (१:३०, ३:०० मि. संरक्षण), सेजल यादव (२:५०, २:३० मि. संरक्षण व २ गुण), संस्कृती भुजबळ (१:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली तर पराभूत शिवनेरीच्या दर्शना सपकाळ (२:५०, २:०० मिनिटे संरक्षण व १ गुण), ऐश्वर्या पिल्ले (२:३०, ३:०० मि. संरक्षण), मयुरी लोटणकर (१:५०, मि. संरक्षण व १ गुण), शिवानी गुप्ता (नाबाद १:३० मि. संरक्षण व १ गुण), अक्षया गावडे (२:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली. शिवानी गुप्ताला झालेल्या दुखापतीमुळे शिवनेरीला हा सामना गमवावा लागला याचीच चर्चा मैदनवर रंगली होती.
दिपेश, नितेश, ओंकारची चमकदार कामगिरी :
पुरुषांच्या अंतिम सामन्यात उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने उपनगरच्याच श्री सह्याद्री संघावर १०-९ (८-४, २-५) असा ४:०० मिनिटे राखून १ गुणाने सहज विजय मिळवला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या दिपेश मोरे (३:२०, ३:०० मि. संरक्षण व १ गुण), नितेश रुके (२:१०, १:५० मि. संरक्षण), ओंकार सोनावणे (१:४०, २:४० मि. संरक्षण) व अनिकेत पोटे (नाबाद १:१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सहज विजयात मोलाची कामगिरी बजावली तर पराभूत अनिकेत चेंदवनकर (१:३०, २:५० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय साळुंखे (१:४०, १:३० मि. संरक्षण), अक्षय भांगरे (१:५० मि. संरक्षण व ३ गुण) व तेजस सावंत (३ गुण) यांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू –
पुरस्कार पुरुष महिला
संरक्षक ओंकार सोनावणे (शिर्सेकर्स महात्मा गांधी संघ) दर्शना सकपाळ (शिवनेरी संघ)
आक्रमक अक्षय भांगरे (श्री सह्याद्री संघ) नम्रता यादव (सरस्वती संघ)
अष्टपैलू दिपेश मोरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी संघ) खुशबू सुतार (सरस्वती संघ)