बंगळूरु – डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध बंगळूरु येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान लाभले आहे. अक्षरच्या समावेशासाठी मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आले आहे.
अक्षरला पायाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले. त्यानंतर करोनाची लागण झाल्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले. दुसरीकडे कुलदीप फेब्रुवारी २०२१ मध्ये अखेरची कसोटी खेळला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी अक्षरचा जयंत यादवच्या जागी मुख्य संघात समावेश करण्यात येईल. गतवर्षी, इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारीत झालेल्या प्रकाशझोतातील कसोटीत अक्षरने तब्बल ११ बळी मिळवले होते.
भारत-श्रीलंका यांच्यात १२ मार्चपासून सुरू होणारी दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येईल. भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी धुव्वा उडवला. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन या जोडीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिसरा फिरकीपटू जयंत यादवला फारशी गोलंदाजी करण्याची संधीही मिळाली नाही.