केएल राहुलच्या लखनऊ संघानं लाँच केली आपली पहिलीवहिली जर्सी

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्सची जर्सी लाँच करण्यात आली. लीगचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी होणार आहे. लखनऊ संघ हा दोन नवीन संघांपैकी एक आहे त्यांनी आपली आयपीएल जर्सी लाँच केली आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊ संघाच्या नवीन जर्सीत फिकट आकाश रंगाचा वापर करण्यात आला आहे. युवा डिझायनर कुणाल रावलने ही जर्सी डिझाइन केली आहे. या संघाचे थीम साँग बादशाहने गायले आहे आणि कोरिओग्राफी रेमो डिसूझाने केली आहे.

या प्रसंगी बोलताना, लखनऊ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी संघाच्या फिकट आकाश रंगाच्या जर्सीवर ‘गरुड’ चिन्हाचा उल्लेख केला आणि सांगितले की त्यांची फ्रेंचायझी ‘उडण्यासाठी तयार’ आहे. योग्य गोष्टींसाठी योग्य लोकांची निवड करण्यावर यश अवलंबून असते, असे ते म्हणाले.

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर हा या संघाचा मेंटॉर आहे. त्याचबरोबर संघाची कमान केएल राहुलच्या हाती आहे. लखनऊ सुपर जायंट्सला २८ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. आवेश खानच्या रूपाने संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू विकत घेतला. त्याचबरोबर या संघाने जेसन होल्डर, एविन लुईस आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या बड्या खेळाडूंवरही बोली लावली.

 

You might also like

Comments are closed.