केरला ब्लास्टर्सची अपराजित मालिका कायम
ओदिशाला नमवून अव्वल क्रमांकावर झेप!

गोवा| केरला ब्लास्टर्सनं इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. निशू कुमार (२८ मि.) व हरमनज्योत खाब्रा ( ४० मि.) यांच्या गोलच्या जोरावर त्यांनी पहिल्या हाफमध्येच ओदिशा एफसीला बॅकफूटवर फेकले होते. दुसऱ्या हाफमध्ये ओदिशाकडून संघर्ष पाहायला मिळाला, परंतु त्यांना पिछाडी भरून काढता आली नाही. केरलाचा संघ मागील दहा सामन्यांत अपराजित आहे आणि आजच्या विजयासह त्यांनी अव्वल स्थानावर झेप घेतली.
केरला ब्लास्टर्स आणि ओदिशा एफसी यांच्यातला सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा होती. पण, पहिल्या मिनिटांपासून केरलानं हल्लाबोल केला. दुसऱ्याच मिनिटाला निशू कूमारच्या थ्रो बॉलवर जॉर्ज डाएझनं गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु ओदिशाचा गोलरक्षक अर्षदीप सिंग त्याच्या मार्गात आडवा झाला. केरलाकडून सातत्यानं आक्रमण होताना दिसले. ओदिशाच्या खेळाडूंजवळ चेंडू अधिक काळ ठेवण्यापासून त्यांनी रोखले होते. पहिल्या २० मिनिटांच्या खेळात हा सामना एकतर्फीच वाटत होता. २३व्या मिनिटाला ओदिशाकडून पहिला शॉर्ट ऑन टार्गेट लावला गेला, परंतु झेव्हियर हर्नांडेझचा हा प्रयत्न केरलाचा गोलरक्षक प्रभसुखन गिल यानं अडवला. पण, पुढच्याच मिनिटाला केरलाकडून प्रत्युत्तर मिळाले.
या पर्वात प्रथमच केरलासाठी स्टार्टिंग प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या निशू कुमारनं बॉक्सबाहेरून सुसाट किक मारली अन् केरलानं २८व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली. एड्रीयन ल्युनाचा पास होता. पुढच्याच मिनिटाला लुना गोल करण्यासाठी पुढे सरसावला अन् यावेळी ओदिशाचा बचावपटू हेन्ड्री अँटोनीनं त्याला ब्लॉक केले. ४०व्या मिनिटाला केरलाला कॉर्नर मिळाला आणि ल्युनाच्या कॉर्नरवरून आलेला चेंडू हरमनज्योत खाब्रानं हेडरद्वारे गोलजाळीत पोहोचवला. खाब्राचा हा पहिला गोल ठरला आणि केरलानं २-० अशी आघाडी मजबूत केली. पहिल्या हाफमध्ये केरला ब्लास्टर्सचे निर्विवाद वर्चस्व दिसले. त्यांनी ४ शॉर्ट ऑन टार्गेट लगावले, तर ओदिशाकडून फक्त दोनच प्रयत्न झाले.
६३व्या मिनिटाला झेव्हियरनं केरलाचा बचाव भेदला अन् जॉनथस चेंडू घेऊन गोलजाळीनजीक जाऊन उभा राहिला. पण, जॉनथसनं गोलजाळीच्या दिशेनं टोलवलेला चेंडू केरलाचा गोलरक्षक प्रभसुखननं रोखला. त्यानं या पर्वात आतापर्यंत २० सेव्ह केले आहेत आणि गोल्डन ग्लोव्ह्जच्या शर्यतीत तो टॉप फाईव्हमध्ये पोहोचला आहे. ७१ व्या मिनिटाला जॉनथसनं हेडरद्वारे मारलेला चेंडू गोलजाळीच्यावरून गेला, पुन्हा एकदा ओदिशाला तोंडचा घास गिळता आला नाही. पहिल्या हाफच्या तुलनेत ओदिशाचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला, त्यांच्या खेळाडूंमध्ये आता ताळमेळ दिसू लागले होते. ७५व्या मिनिटाला ओदिशाच्या हर्नांडेझनं फ्री किकवर गोल करण्याची संधी गमावली. या सामन्यात केरलाच्या प्रशिक्षकांना पंचांनी पिवळे कार्ड दाखवले.
दुसऱ्या हाफमध्ये ओदिशा दोन बदलांसह मैदानावर उतरला. जॉनथस ख्रिस्टियन आणि थोईबा सिंग यांना मैदानावर उतरवून ओदिशानं आक्रमण खेळ करण्याची रणनिती आखली. ४७व्या मिनिटाला फ्री किकवर जॉनथस गोल करण्यासाठी सरसावलाही , परंतु त्याला अंतिम टच देता आला नाही. जॉनथस व थोईबा यांच्या येण्यानं ओदिशाचा खेळ अचानक बदलेला पाहायला मिळाला. निशू कुमार संपूर्ण मैदान कव्हर करताना दिसले. त्याचा खेळ पाहून प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोव्हिच आज खूप आनंदी दिसले. ५६व्या मिनिटाला केरला पुन्हा गोल करण्याच्या नजिक पोहोचले होते. खाब्रानं पेनल्टी बॉक्समध्ये चेंडू पोहोचलवा होता, परंतु ओदिशाची बचावफळी यावेळेस गाफील नव्हती. ५७व्या मिनिटाला ओदिशाचा जेरी चेंडू घेऊन बॉक्समध्ये पोहोचला, पण निशूनं सुरेख ब्लॉक केला.
ओदिशाकडून सातत्यानं प्रयत्न होऊनही त्यांना पिछाडी भरून काढता येत नव्हती. ८४व्या मिनिटाला काऊंटर अटॅकवर नंदाला गोल करता आला नाही. ओदिशाच्या खेळाडूंना गोल करण्यात येत असलेले अपयश पाहून प्रशिक्षक किको रॅमिरेझ प्रचंड नाराज दिसले. केरलाचा अलव्हारो व्हॅझकेजला सातत्यानं प्रयत्न करूनही आज यश पदरी पाडू शकला नाही. केरलानं हा सामना २-० असा जिंकून खात्यातील गुणसंख्या २० अशी बनवली.
निकाल – केरला ब्लास्टर्स २ ( निशू कुमार २८ मि., हरमनज्योत खाब्रा ४० मि.) विजयी विरूद्ध ओदिशा एफसी ०.
Comments are closed.