कानपूरच्या खराब प्रॅक्टिस पीचमुळे द्रविड-रहाणे नाराज, खेळाडूंना जखमा होण्याचा धोका

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर उभय संघांमध्ये नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. भारतीय संघाने ३-० अशा फरकाने या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ही मालिका संपल्यानंतर २५ नोव्हेंबरपासून उभय संघांमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारत आणि न्यूझीलंड संघ कानपूरला पोहोचले आहेत. मात्र येथील स्टेडियमच्या खेळपट्टीवरुन भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार अजिंक्य रहाणेसहित न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेटपटू कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिल्या कसोटीची तयारी करत आहेत. परंतु सराव सत्रांसाठी बनवण्यात आलेली ग्रीन पार्कची खेळपट्टी ही अतिशय उबडधोबड होती आणि यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचा धोकाही होता.

यानंतर दोन्ही संघांनी यावर नाराजी व्यक्त केल्याने आता ग्रीन पार्कच्या खेळपट्टीत सुधारणा केल्या गेल्या आहेत. मंगळवार रोजी (२३ नोव्हेंबर) न्यूझीलंडच्या सराव सत्रादरम्यान पिच क्यूरेटर सरावासाठीची खेळपट्टी नीट करताना दिसले आहेत.

सर्वात आधी द्रविड आणि रहाणेने व्यक्त केली होती नाराजी
पहिल्या कसोटीमधील भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे सर्वात आधी जैव सुरक्षित वातावरणातून बाहेर येत ग्रीन पार्कच्या स्टेडियमवर सरावासाठी पोहोचले होते. ते दोघे जवळपास संध्याकाळी ४.३० वाजता या खेळपट्टीवर गेले होते. यावेळी त्यांनी मैदान आणि खेळपट्टीचे बारकाईने निरिक्षण केले. त्यानंतर पिच क्यूरेटर एल प्रशांत राव यांची भेट घेत खेळपट्टीविषयी चर्चाही केली. यावेळी सरावसाठी उपलब्ध करुन दिलेल्या खेळपट्टीशी द्रविड नाखुश असल्याचे दिसले.

पुढे न्यूझीलंडचे प्रशिक्षकही दिसले नाखुश
त्यानंतर मंगळवार रोजी सकाळी पाहुण्या न्यूझीलंडचा ताफा ग्रीन पार्क स्टेडियमवर पोहोचला होता. त्यांनी या स्टेडियमवर धावणे, स्ट्रेचिंग असे वर्कआऊट केल्यानंतर नेट्सवर सराव करण्यासाठी धाव घेतली. यावेळी प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सरावासाठीच्या खेळपट्टीचे निरीक्षणही केले आणि त्यांच्याही चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवली. त्यांनी खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत नसल्याची तक्रार केली. तसेच यष्ट्यांच्या पोजिशनवरुनही ते नाराज दिसले.

पुढे ग्रीन पार्कचे पिच क्यूरेटर शिवकुमार आणि बीसीसीआयचे न्यूट्रल पिच क्यूरेटर एल प्रशांत राव यांच्यापर्यंत खेळपट्टीसंबंधी तक्रारी पोहोचल्या. त्यानंतर त्वरित मंगळवारी खेळपट्टींमध्ये सुधार केला असून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार सरावही केला आहे.

You might also like

Comments are closed.