लखनऊ -श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इशानने ८९ धावांची खेळी केली.टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत फॉर्ममध्ये परतला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत इशान किशन सातत्याने आउट ऑफ फॉर्म होता. यानंतर त्याने लखनऊ येथे पार पडलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ८९ धावांची खेळी खेळली. यादरम्यान इशानने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात इशानने सर्वाधिक ८९ धावांची खेळी खेळली. यासोबतच तो भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने ऋषभ पंतचा विक्रम मोडला आहे. पंतने २०१९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध यष्टीरक्षक म्हणून नाबाद ६५ धावा केल्या होत्या. इशान किशन ५६ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. त्याला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने बाद केले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ६२ धावांनी पराभव केला. यासोबतच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेला २०० धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने २० षटकांत २ गडी गमावून १९९ धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान यांनी ७१ चेंडूत १११ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावताना ८९ धावा केल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यरने २८ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारा आणि कर्णधार दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.