युवा आक्रमणपटू अँथनी एलंगाने उत्तरार्धात साकारलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात अॅटलेटिको माद्रिदला १-१ असे बरोबरीत रोखण्यात यश आले.
भारतीय वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या अॅटलेटिकोने सातव्या मिनिटाला आघाडी मिळवली. जाओ फेलिक्सने हा गोल केला. बचावात्मक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या अॅटलेटिकोने ही आघाडी बराच वेळ राखली. मात्र, बदली खेळाडू एलंगाने ८०व्या मिनिटाला गोल करत युनायटेडला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. आता या लढतीचा दुसऱ्या टप्प्यातील सामना १६ मार्चला खेळवला जाईल.
अन्य लढतीत, बेन्फिका आणि आयएक्स यांच्यात २-२ अशी बरोबरी झाली. बेन्फिकाचे सेबॅस्टियन हॉलेर (स्वयंगोल, २६वे मिनिट) आणि रोमान यारेमचूक (७२वे मि.) यांनी, तर आयएक्सचे दुसान टाडिच (१८वे मि.) आणि हॉलेर (२९वे मि.) यांनी गोल केले.
अंतिम सामना रशियाबाहेर-
यंदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवण्याचा मान रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराला मिळणार होता. मात्र, रशियाने गुरुवारी युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आता ‘युएफा’ने अंतिम सामना इतरत्र खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना २८ मे रोजी रंगणार आहे.