मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा दुसरा सामना ब्रेबॉर्न मैदानावर मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामाचा पहिला सामना गमावला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा विजयी घास शेवटच्या षटकांमध्ये हिरावला. नाणेफेक जिंकलेल्या दिल्लीने प्रथम गोलंदाजी घेतली आणि मुंबईने त्यांना १७८ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात दिल्लीने ७२ धावांत ५ विकेट गमावल्या, पण ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी ३० चेंडूत नाबाद ७५ धावांची भागीदारी रचत मुंबईकडून विजय हिसकावून घेतला. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कार मिळाला.
दिल्लीचा डाव
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि टीम सेफर्ट यांनी ३० धावांची सलामी दिली. आक्रमक वाटणाऱ्या सेफर्टला मुंबईचा फिरकीपटू मुरुगन अश्विनने माघारी धाडले, अश्विनने सेफर्टला (२१) क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दिल्लीने मनप्रीत सिंग (०) आणि कप्तान ऋषभ पंत (१) यांना लवकर गमावले. मुंबईचे वेगवान गोलंदाज बेसिल थंपी आणि टायमल मिल्स यांनी तिखट मारा करत दिल्लीची अवस्था १० षटकांच्या आत ५ बाद ७२ अशी केली. मुंबई सहज विजय मिळवेल, असे वाटत असताना ललित यादव, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी झुंज दिली. शार्दुलने ४ चौकारांसह २२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अक्षरने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ललितसह अर्धशतकी भागीदारी करत मुंबईच्या विजयाचा घास हिरावला. १८व्या षटकात या दोघांनी डॅनियल सॅम्सला २४ धावा कुटल्या. पुढच्याच षटकात दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून ललितने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४८ तर अक्षरने १७ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. १८.२ षटकात दिल्लीने लक्ष्य गाठले. मुंबईकडून बेसिल थंपीने सर्वाधिक ३ बळी घेतले.
Lalit Yadav – 48*(38)
Shardul Thakur – 22(11)
Axar Patel – 38*(17)All-rounders steal an important win for Delhi Capitals in their first game of the season 🔥#AxarPatel #LalitYadav #DC #MIvDC #IPL2022 #Cricket pic.twitter.com/R6l0izzBf1
— Wisden India (@WisdenIndia) March 27, 2022
मुंबईचा डाव
मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावा उभारल्या. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने रोहितला रोवमन पॉवेलकरी झेलबाद केले. रोहितने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर आलेला अनमोलप्रीत सिंग (८) जास्त धावा काढू शकला नाही. कुलदीपनेच त्याला बाद केले. तिलक वर्माने ३ चौकारांसह २२ धावा करत इशानला चांगली साथ दिली. पोलार्ड, टीम डेव्हिड मोठी खेळी करू शकले नाहीत, इशानने संघाची एका बाजूने पडझड होताना शेवटपर्यंत फलंदाजी केली. दरम्यान त्याने अर्धशतकही पूर्ण केले. २० षटकात मुंबईने ५ बाद १७७ धावा केल्या. इशानने ४८ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीपने १८ धावांत ३ बळी टिपले, तर खलील अहमदला २ बळी घेता आले.