नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२च्या पर्वाचे नवे स्वरूप शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यंदा १० संघांना प्रत्येकी १४ साखळी सामनेच खेळावे लागणार आहेत. मात्र, यंदा या दहा संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे बलाढय़ संघ वेगवेगळय़ा गटात असतील.
बीसीसीआय’ने शुक्रवारी जाहीर केलेल्या गटवारीनुसार, अ-गटात पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. ब-गटात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. २६ मार्चपासून ‘आयपीएल’चा थरार रंगेल.
यंदा १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाचे आपल्या गटातील सर्व संघांशी प्रत्येकी दोन सामने होतील. तसेच दुसऱ्या गटातील आपल्या ओळीत असलेल्या संघाशी दोन, तर अन्य चार संघांशी प्रत्येकी एक सामना होईल. उदाहरणार्थ, मुंबईच्या समोरच्या ओळीत चेन्नई असल्याने उभय संघ दोनदा आमनेसामने येतील.