भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवीन हंगामाच्या आधी अनेक नियमांत बदल केले आहेत. ‘डीआरएस’ ते सुपर ओव्हर यासारख्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे यंदाचा हंगाम आणखी रोमांचक होणार आहे.
आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे. ‘बीसीसीआय’ने करोनाविषयक तसेच डीआरएस आणि सुपर ओव्हरसारख्या नियमांचा समावेश केला आहे.
नवे करोना नियम
‘बीसीसीआय’ने सर्वात मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. करोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास ’आयपीएल’ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.
बीसीसीआय’ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल.
सुपर ओव्हर ‘टाय’ झाल्यानंतरही विजेता
‘आयपीएल’साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे. याचा अर्थ अंतिम फेरीतील दोन संघामधील जो संघ साखळीच्या गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असेल, त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.