मुंबई : आयपीएल २०२२चा सीझन सुरू होण्यास फक्त दोन दिवस उरले आहेत आणि सीएसके विरुद्ध केकेआर सामना ही सलामीची लढत आहे. मात्र याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वानखेडेवर होणाऱ्या सामन्यावर आतंकवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता. दरम्यान , सीएसके विरुद्ध केकेआर आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी, महाराष्ट्र एटीएसने दहशतवाद्यांना अटक करून मोठा हल्ला रोखण्यात यश मिळविले आहे.
महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी दहशतवाद्यांना अटक केली, ज्यांनी चौकशीदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम, खेळाडूंचे हॉटेल आणि मुंबईतील दोन ठिकाणांदरम्यानच्या मार्गावर रेकी केल्याचे उघड केले. दहशतवादी हल्ल्यामुळे स्पर्धा रुळावरून घसरण्याची भीती असल्याने वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेल आणि स्पर्धेदरम्यान मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था पाळली जाणे अपेक्षित आहे. पोलिसांच्या अहवालानुसार,२६मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बीडीडीएस आणि एसआरपीएफ देखील तैनात केले जातील.
आयपीएल २०२२ चे सामने केवळ चार मैदानावर होणार आहेत. वानखेडे स्टेडियम (मुंबई), ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई), डीवाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे). वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने असेही नमूद केले आहे की प्रत्येक संघ वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी ४ सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI) आणि MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे प्रत्येकी ३ सामने खेळेल.