दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी पहिला गेम गमावल्यानंतर थायलंडच्या सुपानिडा कॅटेथिंगवर रोमहर्षक विजय मिळवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अग्रमानांकित सिंधूने सुपानिडाला ११-२१, २१-१२, २१-१७ असे एक तास आणि पाच मिनिटांत नमवले. उपांत्य फेरीत सिंधूची पाचव्या मानांकित रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्सकायाशी गाठ पडणार आहे.
पुरुष एकेरीत फ्रान्सच्या अर्नाऊड मेर्कलेकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करल्याने एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले. मेर्कलने प्रणॉयला २१-१९, २१-१६ असे ५९ मिनिटांत हरवले. मिथुन मंजूनाथने रशियाच्या सीर्गी सिरांटचा ११-२१, १२-१२, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली. मिथुनचा उपांत्य फेरीत मेर्कलेशी सामना होईल. मिश्र दुहेरीत भारताच्या एमआर अर्जुन आणि ट्रिसा जॉली जोडीने फ्रान्सच्या विल्यम व्हिलेगर आणि अॅनी ट्रॅन जोडीला २४-२२, २१-१७ असे नामोहरम केले. महिला दुहेरीत भारताच्या रम्या चिकमेनाहल्ली आणि अपेक्षा नायक जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पुढे चाल मिळाली.