आयपीएल २०२२च्या मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. लिलावापूर्वी, अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन आयपीएल संघांना प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली होती आणि दोन्ही संघांनी त्यांच्या तीन नवीन खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर आयपीएल लिलावाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी लिलावासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात २७० कॅप्ड आणि ३१२ अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. या यादीतून काही मोठी नावे गायब आहेत, जी यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नसल्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या नोंदणी यादीत टी२० क्रिकेटचा विश्व बॉस ख्रिस गेलचे नाव नाही. म्हणजेच आयपीएलच्या १४ सीझननंतर गेलने या वर्षी लीग आणि आयपीएल लिलाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. गेलने स्वतः टी२० विश्वचषकानंतर तो आयपीएलमध्ये खेळत राहील असे जाहीर केले होते. पण बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत नोंदणीकृत खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नाही. ईएसपीएनक्रिकइन्फो च्या अहवालानुसार, मिचेल स्टार्क, बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस गेल, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स आगामी लिलाव यादीतून बाहेर आहेत.
ख्रिस गेलचे नाव नसल्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ख्रिस गेल हा कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जच्या संघाचा भाग होता. लिलावाच्या यादीत गेलचे नाव नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयपीएलने ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावेळी आयपीएल २०२२ मेगा लिलावात सुमारे १२१४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये २७० कॅप्ड, ९०३ अनकॅप्ड आणि ४१ देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. १२१४ पैकी ४९ खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे. या ४९ खेळाडूंपैकी १७ भारतीय आणि ३२ विदेशी खेळाडू आहेत.
भारतीयांमध्ये आर अश्विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना, तर परदेशी खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्हन स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे. यावेळी आयपीएल २०२२ साठी संघांची पर्स ८५ कोटींवरून ९० कोटी रुपये करण्यात आली आहे.