बिगरमानांकित अमांडा अॅनिसिमोव्हाने शुक्रवारी धक्कादायक विजयाची नोंद करताना गतविजेत्या नाओमी ओसाकाला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. अग्रमानांकित अॅश्ले बार्टी, मातब्बर राफेल नदाल, टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान सुनिश्चित केले.
महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या २० वर्षीय अॅनिसिमोव्हाने रोमहर्षक लढतीत जपानच्या १३व्या मानांकित ओसाकाला ४-६, ६-३, ७-६ (१०-५) असे नमवले. टायब्रेकपर्यंत लांबलेला हा सामना २ तास, १५ मिनिटे रंगला. पुढील फेरीत अॅनिसिमोव्हासमोर ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे कडवे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या बार्टीने इटलीच्या ३०व्या मानांकित कॅमिला जिऑर्जीला ६-२, ६-३ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. मात्र ओसाकाच्या पराभवामुळे बार्टी आणि तिच्यातील उपउपांत्यपूर्व लढतीचा आस्वाद लुटण्याची चाहत्यांची संधी निसटली.
बेलारुसच्या २४व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने १५व्या मानांकित एलिना स्विटोलिनाचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. फ्रेंच विजेत्या चौथ्या मानांकित बाबरेरा क्रेजिकोव्हाने जेलेना ओस्तापेन्कोवर ४-६, ६-४, ६-४ अशी मात केली. रविवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत २०१२, २०१३ची विजेती अझारेंका आणि क्रेजिकोव्हा आमनेसामने येतील. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेसाठी ३२ वर्षीय अझारेंकाने आपला पाच वर्षीय मुलगा लिओसह हजेरी लावली. लिओने आईच्या खेळाविषयी फक्त ‘अप्रतिम’ असा शब्द उच्चारून सर्वाची मने जिंकली.
पुरुषांमध्ये स्पेनच्या २० ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने रशियाच्या २८व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हला ६-३, ६-२, ३-६, ६-१ असे नेस्तनाबूत केले. सहाव्या मानांकित नदालचा पुढील लढतीत एड्रियन मॅनारिनोशी सामना होईल. जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने रॅडू अल्बोटला ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या प्रतीक्षेतील झ्वेरेव्हची कॅनडाच्या १४व्या मानांकित डॅनिस शापोवालोव्हशी गाठ पडेल. शापोवालोव्हने रीले ओपेल्कावर ७-६ (७-४), ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेओ बेरेट्टिनीने स्पेनच्या कार्लोस गार्फिआवर ६-२, ७-६ (७-३), ४-६, २-६, ७-६ (१०-५) अशी तब्बल पाच सेट आणि ४ तास, १० मिनिटांच्या झुंजीनंतर सरशी साधली.