मुंबई | जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ८ ते १५ ओक्टो. २०२२ या कलावधीत इनडोर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित करणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. गेल्या दोन वर्षात कोविड-१९ परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही मोठ्या स्पर्धा घेता आल्या नव्हत्या. मात्र आता परिस्थिति निवळत असल्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. ४ ते ७ मार्च २०२२ या कलावधीत श्रीलंका वि यूएई अशी मालिका यूएई मध्ये पार पडली तर २९ मार्च ते १ एप्रिल या कलावधीत दुबई येथे इंग्लंड, द. आफ्रिका व यूएई यांच्यात तिरंगी स्पर्धा रंगली आहे.
भारतीय इनडोअर क्रिकेट संघ २०१० पासून इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अधिपत्याखाली खेळतो. आशियाई संघांमध्ये भारतीय संघ मजबूत असून कोविड-१९ परिस्थिती नंतर हे स्थान टिकवणे व ऑस्ट्रेलिया येथे ८ ते १५ ओक्टो. या कलावधीत होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत मोठी कामगिरी करण्याची जबाबदारी भारतीय खेळाडूंवर असेल. २०१४ साली न्यूझीलंड व २०१७ साली दुबई येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या स्थानी राहिला होता.
आता ही स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखाली ऑस्ट्रेलियात होत आहे. या स्पर्धेत ९ देश सहभागी होत असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, द. आफ्रिका, भारत, श्रीलंका, यूएई, मलेशिया व सिंगापूर हे देश सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा खुल्या गटात पुरुष व महिला तर २१ वर्षाखालील मुले व मुली या गटात पार पडणार आहेत. यासाठी भारतीय संघाची बांधणी सुरू असून राष्ट्रीय स्पर्धा मे अखेरीस बेंगळुरू येथे पार पडणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे संघ महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली सहभागी होणार आहेत. त्यासाठी लवकरच खुल्या गटाच्या पुरुष-महिला व २१ वर्षाखालील मुले-मुली गटाच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याचे क्षितिज वेदक-संस्थापक चेअरमन व बाळ तोरसकर– संस्थापक महासचिव यांनी कळविले आहे.
इनडोअर क्रिकेट साठो १२ मी. X ३० मी. चे चारी बाजूने व वर ४.५ मी. वर जाळीने बंदिस्त असलेले क्रीडांगण लागते. या स्पर्धेत ८ खेळाडू प्रत्यक्ष खेळतात तर २ खेळाडू राखीव असतात. २२ यार्डच्या खेळपट्टीमध्ये अर्ध्या खेळपट्टीवर धाव काढली जाते (Half pitch running between the wicket) व घोषित धावा यामुळे हे सामने थरारक होतात. १६-१६ षटकांच्या सामन्यात ४ जोड्या फलंदाजीला येतात व प्रत्येक जोडीला ४ षटके फलंदाजी करावी लागते. या दरम्यान बाद झाल्यास प्रत्येक बाद प्रकरणात ५ रन वजा केले जातात तर क्षेत्ररक्षण करणार्या संघातील प्रत्येक खेळाडूला २-२ षटके गोलंदाजी करावी लागते. नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्यापूर्वी फलंदाजी घेणार्या संघाला आपल्या फलंदाजांच्या ४ जोड्या क्रमवारी जाहीर कराव्या लागतात तर त्यानंतर क्षेत्ररक्षण करणार्या संघाला सुध्दा ४ जोड्या क्रमवारी जाहीर कराव्या लागतात.