ली ताहूहूच्या (२७ धावा आणि एक बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने १८ धावांनी विजय मिळवला.
तर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय महिला संघाला यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला २० षटकांत ८ बाद १३७ धावाच करता आल्या. स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत शेफाली वर्मा (१३) आणि यास्तिका भाटिया (२६) यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी ४१ धावांची सलामी दिल्यावर लेग-स्पिनर अमिलिया कर हिने एकाच षटकांत दोघींनाही माघारी पाठवले. यानंतर एस. मेघनाचा (३७) अपवाद वगळता भारताची एकही फलंदाज १५ धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५५ अशी धावसंख्या उभारली. सुझी बेट्स (३६) आणि कर्णधार सोफी डिव्हाइन (३१) यांनी ६० धावांची सलामी दिली. मग ताहूहू (२७) आणि मॅडी ग्रीन (२६) यांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला.