नवी दिल्ली – श्रीलंकेविरुद्ध शनिवारपासून बंगळूरु येथे खेळवण्यात येणाऱ्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात किमान एक बदल अपेक्षित आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात संघातील स्थानासाठी चुरस असून ऑफ स्पिनर जयंत यादवला वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
मोहालीच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जयंतने १७ षटके गोलंदाजी करताना एकही बळी मिळवला नाही. तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जोडीने श्रीलंकेच्या २० पैकी १५ फलंदाजांना बाद केले.
मात्र श्रीलंकेच्या आघाडीच्या सहापैकी चार फलंदाज डावखुरे असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन दोन डावखुऱ्या फिरकीपटूंना खेळवण्याची जोखीम पत्करणार की सिराजला संघात स्थान देऊन वेगवान गोलंदाजी बळकट करणार, हे पाहणे रंजक ठरेल. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांनासुद्धा तितकीच मदत मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीत मात्र पहिल्या कसोटीतील क्रमच कायम ठेवण्यात येईल, असे दिसते.
त्यातच आता अक्षर पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. इंग्लंडविरुद्ध गतवर्षी झालेल्या प्रकाशझोतातील कसोटीत त्याने ११ बळी मिळवले होते. फलंदाजीतही तो जयंतच्या तुलनेत उजवा असल्याने अक्षरकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.