बंगळूरु -रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गृहमैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कारकीर्दीतील ‘शतकदुष्काळ’ संपवेल अशी क्रिकेटचाहत्यांना आशा आहे. शनिवारपासून भारत-श्रीलंका यांच्यात सुरू होणाऱ्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटीसाठी बंगळूरु सज्ज झाले आहे.विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१व्या शतकाची प्रतीक्षा गेले २८ महिने संपलेली नाही.
योगायोगाची बाब अशी की कोहलीने कारकीर्दीतील ७०वे शतक झळकावले, तेही प्रकाशझोतातील कसोटीत. नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात त्याने १३६ धावांची खेळी साकारली होती.
या खेळीनंतर २८ डावांत विराट कसोटी शतकापासून वंचित राहिला. यापैकी सहा डावांत ३३ वर्षीय विराटने ५० धावांचा टप्पा ओलांडला. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली ७९ धावांची खेळी, ही या शतकप्रतीक्षेतील सर्वाधिक धावांची खेळी ठरली. मोहालीत विराटने शतकी कसोटी सामन्यात ४५ धावा काढल्या होत्या. श्रीलंकेच्या दुबळय़ा गोलंदाजीच्या माऱ्यापुढे विराटला शतकासाठी उत्तम वातावरण उपलब्ध असेल.
दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेला वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराची उणीव तीव्रतेने भासू शकेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकणार नाही. मात्र दुष्मंता चमीरा त्याची जागा घेऊ शकेल. कारकीर्दीतील अखेरची मालिका खेळणारा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल पहिल्या कसोटीत उत्तम धावसरासरी राखू शकला.
प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना फिरकीपटू जयंत यादवच्या जागीत अष्टपैलू अक्षर पटेल किंवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यापैकी एकाला संधी मिळू शकते. मोहालीत श्रीलंकेचे फलंदाज झगडत असतानाही जयंत प्रभाव पाडू शकला नाही. दोन्ही डावांतील १७ षटकांमध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही. अहमदाबादला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात अक्षरने ११ बळी मिळवले होते. त्यामुळे अक्षरचे पारडे जड मानले जात आहे; परंतु खेळपट्टीवर गवत असल्याने सिराजलाही प्राधान्यक्रम मिळू शकतो. मोहालीत जडेजाने ९ आणि अश्विनने ६ बळी घेतले होते.
वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी
कसा रंग हा सामना पाहणे महत्त्वाचे ठरेल.