मुंबई : भारतात प्रथमच ६० व्हीलचेअर खेळाडूंचा समावेश असलेल्या प्रीमियर बास्केटबॉल लीगचे शनिवारपासून आयोजन करण्यात येणार आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’ उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या मनात अपंगांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याच्या हेतूने १२ आणि १३ मार्च रोजी मुंबईत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने या उपक्रमासाठी ९३ लाखांची मदत केली आहे.
शनिवारी नागपाडा आणि रविवारी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए केंद्रात दुपारी चार वाजल्यापासून या लीगचे सामने होतील. या लीगमध्ये २० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्हीलचेअर खेळाडू सहभागी होणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातून १०० व्हीलचेअर बास्केटबॉलपटू घडवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी डोळय़ांसमोर ठेवले आहे.
या लीगमध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी दोन पुरुष आणि महिला संघही खेळणार असून पुढील पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी त्यांना सज्ज करण्याकरिता ही लीग उपयुक्त ठरेल, असा आशावादसुद्धा आयोजकांनी व्यक्त केला.
देशभरात असंख्य अपंग नागरिक असून त्यांपैकी अनेकांना क्रीडा क्षेत्रात रुची आहे. या लीगद्वारे त्यांना स्वत:चे बास्केटबॉलमधील कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल,’’ असे मत मुंबई व्लीलचेअर बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष अब्राहम पोलोस यांनी व्यक्त केले.