दुबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २९ जुलै, २०२२ या दिवशी होणाऱ्या सामन्याने तब्बल २४ वर्षांनी बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.
२०२०मध्ये झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीचे स्पर्धक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने या साखळी-वजा-बाद फेरीच्या स्पर्धेला सुरुवात होईल. पदकांसाठीचे सामने ७ ऑगस्टला होणार आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला ट्वेन्टी-२० क्रिकेट या खेळाचीच पहिली कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली आहे. ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे सात संघ आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. श्रीलंका हा आठवा संघ या स्पर्धेसाठी निश्चित झाला आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा महासंघ यांनी संयुक्तपणे मंगळवारी जाहीर केले.
२ राष्ट्रकुलमध्ये दुसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याआधी १९९८च्या क्वालालम्पूर राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेला स्थान देण्यात आले होते. शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवून सुवर्णपदक पटकावले होते.