मस्कत : ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरच्या (तिसऱ्या मिनिटाला, ४९व्या मि.) नेत्रदीपक कामगिरीमुळे भारताच्या महिला संघाने मंगळवारी सलग दुसऱ्या सामन्यात चीनवर २-१ असा विजय मिळवत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले आहे.
भारताने सोमवारी सलामीच्या सामन्यात चीनवर ७-१ असा शानदार विजय मिळवला. याच संघाला पुन्हा दुसऱ्या सामन्यात हरवताना गोलवर्षांवापेक्षा सावध पवित्रा पाहायला मिळाला. भारत आणि नेदरलँड्स यांच्या खात्यांवर दोन सामन्यांतून प्रत्येकी ६ गुण जमा आहेत. पण भारताने गोलफरकाच्या बळावर सरशी साधली आहे.
सामना सुरू झाल्यापासून चीनच्या खेळात अनुभवाचा अभाव आढळला. पहिल्या सत्रात चेंडूवर ताबा, पास करण्यातील गफलत याचा फटका चीनला बसला. भारतीय संघाने मात्र आत्मविश्वासाने खेळ करीत सामन्याची पकड निसटू दिली नाही. भारताने चीनच्या बचावावरील दडपण सुरुवातीपासून निर्माण केले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला गुर्जितने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण करीत भारताचे खाते उघडले. भारताकडून गोलच्या आणखी काही संधी निर्माण झाल्या, परंतु चीनची गोलरक्षक वू सुराँगने त्या हाणून पाडल्या. दुसऱ्या सत्रातही चीनने भारताला गोल करू दिला नाही. त्यामुळे पूर्वार्धात भारताकडे १-० अशी आघाडीच मर्यादित राहिली.
तिसऱ्या सत्रात ३९ मिनिटाला शुमिन वँगने भारतीय बचाव आणि गोलरक्षक सविताला चकवून चीनच्या खात्यावर पहिला गोल जमा केला. मग चौथ्या सत्रात ४९व्या मिनिटाला गुर्जितने पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसरा गोल झळकावून भारताला आघाडी मिळवून दिली. मोनिकाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.