पुणे – म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे सुरू असलेल्या टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. मंगळवारी पुण्याच्या अर्जुन कढेला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
पोर्तुगालच्या जाओ सौसाने अर्जुनचा टायब्रेकमध्ये ६-७, (५-७), ७-६ (७-४), ६-२) असा पराभव केला. तीन सेटपर्यंत लांबलेला हा सामना सौसाने २ तास आणि २५ मिनिटांत जिंकला. सोमवारी भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनलासुद्धा सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
सौसा-अर्जुन सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चौथ्या गेमपर्यंत आपापल्या सव्र्हिस राखल्या. पाचव्या गेममध्ये जाओने अर्जुनची, तर सहाव्या गेममध्ये अर्जुनने जाओची सव्र्हिस ब्रेक केली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सव्र्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये अर्जुनने आक्रमक खेळ करत जाओविरुद्ध हा सेट ७-६ (७-५) असा जिंकून आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सव्र्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये ३-१ अशा फरकाने आघाडीवर असताना जाओने सुरेख खेळ करत सहाव्या गेममध्ये अर्जुनची सव्र्हिस भेदली व बरोबरी साधली. त्यानंतर जाओने नेटजवळून चतुराईने खेळ करत हा सेट अर्जुनविरुद्ध ७-६ (७-४) अशा फरकाने जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.
तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये जाओने वरचढ खेळ करत पहिल्याच गेममध्ये अर्जुनची सव्र्हिस भेदली व स्वत:ची सव्र्हिस राखत २-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतरदेखील जाओने अर्जुनला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही व तिसऱ्या गेममध्ये अर्जुनची पुन्हा सव्र्हिस भेदली व स्वत:ची सव्र्हिस राखत हा सेट ६-२ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या स्वीडनच्या एलियास येमेर याने पात्रता फेरीचा अडथळा ओलांडून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इटलीच्या जियान मार्को मोरोनीचा ७-५, ३-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित व फिनलँडच्या एमिल रुसूवोरी याने बेलारूसच्या एगोर गेरासिमोव्हचा ६-०, ७-६ (१३-११) असा पराभव करून आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत ८६व्या स्थानी असलेल्या पोलंडच्या कॅमिल माझरेख याने ग्रेट ब्रिटनच्या जे क्लार्कचा ६-३, ७-५ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १४४व्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अलेक्झांडर उकिक याने जागतिक क्र. १५५ असलेल्या फ्रान्सच्या हुगो ग्रेनियरचा २-६, ६-२, ७-६ (७-४) असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत पहिल्या फेरीत इटलीच्या जियानलुका मागेरने फिनलँडच्या एमिल रुसूवोरीच्या साथीत चौथ्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या मार्क पोलमन्स व मॅट रीड यांचा ६-४, ६-४ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात इटलीच्या फेडरिको गायो व लॉरेन्झो मुसेट्टी या जोडीने मेक्सिकोच्या हंसवेच मुर्दोगो व मिगुल एग्नल रियास-वेरेला यांचा ६-४, ४-६, १०-८ असा पराभव करून आगेकूच केली.