दीपक चहरच्या (३४ चेंडूंत ५४ धावा) झुंजार अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेत २-१ अशी सरशी साधणाऱ्या यजमान आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा क्विंटन डीकॉक (१३० चेंडूंत १२४ धावा) सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे .
केप टाऊन येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.२ षटकांत २८३ धावांत आटोपला. कर्णधार केएल राहुल (९) लवकर माघारी परतल्यावर सलामीवीर शिखर धवन (६१) आणि विराट कोहली (६५) या अनुभवी जोडीने ९८ धावांची भागीदारी रचली. मात्र, अँडिले फेहलुकवायोने एकाच षटकात धवन आणि ऋषभ पंत यांना बाद केले. कोहलीला डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने माघारी धाडत भारताची ४ बाद १५६ अशी अवस्था केली. यानंतर सूर्यकुमार यादव (३९) आणि श्रेयस अय्यर (२६) हे मुंबईकर फलंदाज काही चांगले फटके मारून बाद झाले.
मग चहरने ३४ चेंडूंतच पाच चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने ५४ धावा फटकावल्या. त्याने तळाच्या जसप्रीत बुमरासोबत (१२) आठव्या गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, भारताला तीन षटकांत १० धावांची आवश्यकता असताना लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर बुमरा आणि यजुर्वेद्र चहल (२) झटपट माघारी परतल्याने भारताचा पराभव झाला.
त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा डाव ४९.५ षटकांत २८७ धावांत संपुष्टात आला. आफ्रिकेची ३ बाद ७० अशी स्थिती असताना डीकॉक आणि रासी वॅन डर डसेन (५९ चेंडूंत ५२) यांनी चौथ्या गडय़ासाठी १४४ धावांची भागीदारी रचली. डीकॉकने एकदिवसीय कारकीर्दीतील १७वे शतक साकारले. परंतु त्याला १२४ धावांवर बुमराने बाद केले. पुढच्याच षटकात चहलच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या नादात डसेन माघारी परतला. मात्र, डेव्हिड मिलर (३९) आणि ड्वेन प्रिटोरियस (२०) यांच्या योगदानामुळे आफ्रिकेला २८० धावांचा टप्पा ओलांडता आला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ४९.५ षटकांत सर्वबाद २८७ (क्विंटन डीकॉक १२४, रासी वॅन डर डसेन ५२; प्रसिध कृष्णा ३/५९) विजयी वि. भारत : ४९.२ षटकांत सर्वबाद २८३ (विराट कोहली ६५, शिखर धवन ६१, दीपक चहर ५४; अँडिले फेहलुकवायो ३/४०)