भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. इथे क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूला देव मानले जाते. बऱ्याचदा भारतीय क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी मैल न मैल अंतर पार करुन येत असतात. संधी मिळताच क्रिकेटपटूंना वंदन करणे, त्यांच्याप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करणे, हे भारतीय चाहत्यांसाठी मोठी बाब नाही. अशाच एका भारतीय चाहत्याने भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याच्याप्रती असलेले आपले निस्सीम प्रेम व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) रांची येथे दुसरा टी२० सामना झाला. या सामन्यादरम्यान एका भारतीय क्रिकेट चाहत्याने मैदानात जाऊन रोहितचे चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या चाहत्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना या चाहत्याने रांचीच्या मैदानात प्रवेश केला आणि रोहितकडे धाव घेतली. रोहित पुढे दिसताच त्या चाहत्याने त्याच्यापुढे दंडवत घातले आणि त्याच्या पाया पडत प्रेम व्यक्त केले. यावेळी रोहितनेही त्या चाहत्यास आपल्या पाया पडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचे फोटोत दिसते आहे. कॅमेरात कैद झालेल्या या संपूर्ण दृश्याने सामना दर्शकांची मात्र मने जिंकली आहेत.
A Cricket Fan tried to touch the feet of the Indian Captain Rohit Sharma. pic.twitter.com/UshX3fJ6z3
— Cric Boli (@BoliCric) November 19, 2021
दरम्यान रोहितच्या नेतृत्त्व कामगिरीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने भारतीय टी२० संघाचा नियमित कर्णधार म्हणून दिमाखात सुरुवात केली आहे. त्याने जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. यानंतर रांचीतील दुसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय प्रशंसनीय राहिले आणि ७ विकेट्सने हा सामना जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
याच सामन्यादरम्यान रोहितने अर्धशतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४५० षटकारांचा आकडाही गाठला आहे. असे करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी२०) ४५० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्यात केवळ २ फलंदाजांना यश आले आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांचा यात समावेश आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार ठोकले आहेत. तर आफ्रिदीने ४७६ षटकारांचा आकडा गाठला होता.