लंडन : काय हॅवर्ट्झने अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात न्यूकॅसलवर १-० अशी मात केली.
प्रीमियर लीगच्या कार्यकारी मंडळाने रशियन उद्योजक रोमन अब्रामोव्हिच यांना चेल्सीचे मालक म्हणून अपात्र ठरवले. त्यानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळताना चेल्सीच्या संघाने झुंजार खेळ केला. त्यांनी न्यूकॅसलला नमवत आपली विजयी घोडदौड कायम राखली. हा त्यांचा प्रीमियर लीगमधील सलग पाचवा विजय ठरला.
अन्य लढतींत वेस्ट हॅमने अॅश्टन व्हिलाला, वॉटफर्डने साउदम्टनला, तर लीड्स युनायटेडने नॉर्विच सिटीला प्रत्येकी २-१ असे पराभूत केले. तसेच आर्सनलने लिस्टर सिटीला २-० असे नमवले.
या सामन्यात दोन्ही संघांना आक्रमणात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. आंद्रेस ख्रिस्टिन्सन, हॅवर्ट्झ आणि रोमेलू लुकाकू या चेल्सीच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना याचा फायदा घेता आला नाही. अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जॉर्जिन्होच्या पासवर हॅवर्ट्झने गोल करत चेल्सीला १-० असा विजय मिळवून दिला.