मेलबर्न – ऑस्ट्रेलियाची आघाडीची टेनिसपटू अॅश्ले बार्टीने शनिवारी रॉड लेव्हर एरिनामध्ये पाऊल टाकताच टाळय़ांचा मोठा कडकडाट झाला. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या बार्टीकडून घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. मात्र, या दडपणातही बार्टीने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचे आव्हान ६-३, ७-६ (२) असे परतवून लावत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची ४४ वर्षांतील पहिली स्वदेशी विजेती म्हणून मिरवण्याचा मान पटकावला.
१९८०मध्ये वेंडी टर्नबुल यांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर ही कामगिरी करणारी बार्टी पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू ठरली. अव्वल मानांकित बार्टी ख्रिस्टीन ओनिल यांच्यानंतरची पहिलीच स्वदेशी विजेती ठरली. ओनिल यांनी १९७८मध्ये हा पराक्रम केला होता. तसेच हे बार्टीचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. तिने यापूर्वी २०१९मध्ये फ्रेंच खुली स्पर्धा, तर मागील वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. २५ वर्षीय बार्टीने कॉलिन्सविरुद्ध पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कॉलिन्सने दुसऱ्या आणि सहाव्या गेममध्ये बार्टीची सव्र्हिस मोडताना ५-१ अशी आघाडी मिळवली. मग बार्टीने पुढील सहापैकी पाच गेम जिंकत ६-६ अशी बरोबरी केली. त्यानंतर तिने टायब्रेकरमध्ये ७-२ अशी बाजी मारली. १बार्टीने यंदाच्या स्पर्धेत सहा सामन्यांत केवळ एक गेम (अमांडा अनिसिमोव्हाविरुद्ध) गमावला. तर प्रतिस्पर्धी खेळाडूला बार्टीविरुद्ध एकही सेट जिंकता आला नाही. ३ बार्टीचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. याआधी तिने फ्रेंच खुली स्पर्धा (२०१९) आणि विम्बल्डन (२०२१) स्पर्धा जिंकली होती.
अॅश्ले बार्टी म्हणाली ,आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मला इतक्या लोकांचे प्रेम आणि प्रोत्साहन लाभले यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला अंतिम सामन्यातील प्रेक्षकांसमोर खेळताना खूप मजा आली. त्यांच्या पाठब्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळाली.
नदालच्या मार्गात मेदवेदेवचा अडथळा-
मेलबर्न : स्पेनच्या राफेल नदालला विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत असून रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्या मार्गात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा अडथळा असेल. मागील वर्षी जुलैमध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या सांगतेपासून २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाबद्दल चर्चा केली जात आहे. सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला मागील वर्षी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती. मात्र, मेदवेदेवने जोकोव्हिचाचा स्वप्नभंग करताना कारकिर्दीतील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. आता त्याचे सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे लक्ष्य असेल. २०१९मध्ये या दोघांत झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नदालने बाजी मारली होती.
- पुरूष एकेरी (अंतिम फेरी) : राफेल नदाल वि. डॅनिल मेदवेदेव ’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)