औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर उत्कृष्ट दर्जाच्या एकूण चार क्रिकेट खेळाडूंचे मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य अॅड. मोहन सावंत यांनी चेंडू खेळून उद्घाटन केले. तसेच मैदानावर सामना खेळण्यासाठी दोन मुख्य खेळपट्ट्या आणि एक सिमेंट व एक मातीची सराव खेळपट्टी बनवण्यात आली आहे.
दोन्ही सराव खेळपट्ट्यांवर बॉक्स नेट लावण्यात आली. व खेळपट्टी बनवण्यासाठी तीन फूट खोल खड्डा खोदला, त्यामध्ये जाड खडी, मुरूम, बारीक खडी, विटांचा थर आणि अखेर पोयटा मातीने पीच बनवण्यात आली आहे.
ही पिच गोलंदाज व फलंदाज दोघांना मदतगार आहे. तर मैदानावर उच्च जातीचे सिल्व्हर वन गवत रोपण केले असून पिण्यासाठी आधुनिक स्पिंकलर लावले आहेत. पिच क्युरेटर संतोष दहीहंडे यांनी ही खेळपट्टी बनवली. प्रशिक्षक दिनेश कुटे व ईशांत राय यांनी मैदानासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. उद्घाटनाप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, डॉ .विनाश येळीकर, त्रिंबक पाधीकर , विवेक भोसले ,प्रदीप चव्हाण, प्रा. एस. जी. माळी, प्राचार्य अशोक तेजनकर, तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर शेखर शिरसाठ आदींची उपस्थिती होती.