पुणे : भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ल्युक सेव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीवर मात केली.
पुणे येथे रंगलेल्या या स्पर्धेतील पुरुष दुहेरीचा अंतिम सामना बोपण्णा-रामनाथन जोडीने ६-७ (१०), ६-३, १०-६ असा जिंकला. एक तास आणि ४४ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्याचा पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यात भारतीय जोडीला यश आले. बोपण्णाच्या कारकीर्दीतील हे एकूण २१वे, तर रामनाथनचे दुसरे एटीपी दुहेरी जेतेपद ठरले. तसेच एकत्रित खेळताना हे त्यांचे दुसरे एटीपी जेतेपद आहे. त्यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी झालेली अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही जोडय़ांनी चांगली सव्र्हिस केली. बोपण्णा-रामनाथन जोडीकडे ३-२ अशी आघाडी होती आणि ते सहाव्या गेममध्ये ४०-३० असे पुढे होते. मात्र स्मिथ त्याची सव्र्हिस राखण्यात यशस्वी ठरला. दोन्ही जोडय़ांनी पुढेही उत्तम खेळ सुरू ठेवल्याने ६-६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकर खेळवण्यात आला आणि यात सेव्हिल-स्मिथ जोडीने बाजी मारली.
दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-रामनाथन जोडीने दमदार पुनरागमन केले. त्यांनी ऑस्ट्रेलियन जोडीची सव्र्हिस दोन वेळा मोडत हा सेट ६-३ असा मोठय़ा फरकाने जिंकला. त्यामुळे विजेती जोडी ठरवण्यासाठी सुपर टायब्रेकर खेळवण्यात आला. यात बोपण्णा-रामनाथन जोडीने १०-६ अशी सरशी साधत मायदेशातील या स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.